महत्वाच्या बातम्या

 फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : लाखनीत २९ सप्टेंबरला जिल्हास्तरीय फळपीक मार्गदर्शन कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यातील फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, फळबाग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय फळपीक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता रामकृष्ण मंगल कार्यालय, लाखनी येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत आंबा, पेरू व बोर या फळपिकांच्या लागवडीपासून ते विक्रीव्यवस्थापनापर्यंत विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यशाळेस निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ डॉ. भगवानराव कापसे, तसेच प्रगतशील शेतकरी प्रविण तवाडे व  प्रविण कापगते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. फळबागेतील आधुनिक तंत्रज्ञान, पिकांचे व्यवस्थापन, उत्पादनवाढ, कीड-रोग व्यवस्थापन तसेच फळपिकांमधील विविध अडचणींबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

कार्यशाळेचे उद्घाटन सावनकुमार, जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संगीता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा राहणार आहेत. तसेच कृषी विभाग व आत्मा विभागातील अधिकारी आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जिल्ह्यातील आंबा, पेरू, बोर तसेच इतर फळपिकांची लागवड करणाऱ्या व फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेस आवर्जून उपस्थित राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन उर्मिला चिखले प्रकल्प संचालक (आत्मा), भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






Related Photos