महत्वाच्या बातम्या

 सुरक्षा रक्षकच निघाले चोर! सीएसटीपीएसमधील कॉपर केबल चोरीचा दुर्गापूर पोलिसांनी केला पर्दाफाश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या (सीएसटीपीएस) परिसरात सुरक्षेची जबाबदारी असतानाही कॉपर केबल चोरीच्या गंभीर प्रकरणात काही सुरक्षा रक्षकांचा सहभाग समोर आला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांचा तपास करत दुर्गापूर पोलिसांनी धडक कारवाई करीत तब्बल १० आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ६ क्विंटल कॉपर वायर आणि चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रक असा एकूण २२ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सीएसटीपीएस परिसरातून मोठ्या प्रमाणात कॉपर केबल चोरीला जात असल्याने दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी विशेष गुन्हे शोध पथक तयार केले. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे १८ सप्टेंबर रोजी पहाटे कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७ लाख २० हजार रुपये किमतीची कॉपर वायर जप्त करण्यात आली. तसेच चोरीच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही पोलिसांच्या हाती लागला.

विशेष म्हणजे, या प्रकरणात सुरक्षा रक्षकांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे सीएसटीपीएससारख्या संवेदनशील औद्योगिक प्रकल्पाच्या सुरक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडूनच चोरीला हातभार लागल्याने या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे.

या प्रकरणी फिर्यादी सहदेव कैलास नारनवरे यांच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, चोरीच्या या साखळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेंगावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील पोउपनि संदीप बच्छीरे, पोहवा राजू गोखरे, पोअं संदीप जाधव, सोनल खोब्रागडे, स्विखील उराडे आणि कोमल मोहजे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

दुर्गापूर पोलिसांच्या या कारवाईमुळे सीएसटीपीएस परिसरातील कॉपर केबल चोरीच्या घटनांना मोठा धक्का बसला असून, तपासातून चोरीचे आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos