महत्वाच्या बातम्या

 शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करा : जुनी पेन्शन लागू करा


- शिक्षकदिनी राज्यभर काळ्या फिती लावून निषेध; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट : महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राज्यभर काळ्या फिती लावून काम करीत निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे. शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन त्यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

२०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीमधून सूट द्या -
सन २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेले शिक्षक तत्कालीन प्रचलित नियमांनुसार पात्र व कायदेशीररीत्या नियुक्त झालेले आहेत. या शिक्षकांनी गेल्या १० ते १५ वर्षांपासून सेवा बजावली आहे. एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांच्यावर पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांच्या सेवेला पुन्हा पात्रता परीक्षेच्या निकषावर तपासण्याऐवजी त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाज्येष्ठतेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या धर्तीवर स्वतंत्र निर्णयाची मागणी -
तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ठराव मंजूर करून सन २०१० पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेतून कायमस्वरूपी सूट द्यावी. अथवा सेवारत शिक्षकांसाठी स्वतंत्र मूल्यमापन व्यवस्था लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.शिक्षकांच्या प्रदीर्घ सेवेला आणि अनुभवाला योग्य तो न्याय देऊन शासनाने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्याची मागणी -
शिक्षक व कर्मचाऱ्यांना सामाजिक तसेच आर्थिक सुरक्षेची हमी देणारी जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी, ही संघटनेची आणखी एक प्रमुख मागणी आहे. निवृत्तीनंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.शासनाने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शिक्षकदिनी काळ्या फिती लावून निषेध -
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षक काळ्या फिती लावून नियमित कामकाज करीत निषेध नोंदविणार आहेत. हा निषेध लोकशाही आणि शांततामय मार्गाने करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. मागण्यांकडे दुर्लक्ष कायम राहिल्यास येत्या काळात राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

पदाधिकाऱ्यांचा सहभाग -
या आंदोलनाचा इशारा राज्य संयुक्त सरचिटणीस माया चाफले, जिल्हाध्यक्ष गजानन भुते, जिल्हा सरचिटणीस संजय नंदनवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी विहीरकर, कार्याध्यक्ष छत्रपती फाटे, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे, उपाध्यक्ष गजानन आस्कर, शुभांगी वासनिक व अनिता गुंडे, जिल्हा सल्लागार प्रफुल घोडे, केंद्रप्रमुख प्रतिनिधी नितीन खोडे यांच्यासह राजाभाऊ मने, राहुल खोडे, श्रीधर घोडमारे, रमेश भिलकर, मुकुंद गुजरकर, वासुदेव तडस, प्रशांत गिरडकर, संजय पादाडे, सचिन येवले, विनोद निमजे, गजानन सोनवणे, अरविंद मुंगल, राजू नन्नोरे, माधव काकडे, छत्रपती रोकडे, प्रभाकर मंदरे, रवींद्र सुपारे, राजू कुटे, मनोज मुंगले, रमेश कामडी, प्रवीण बिडकर व विजय लिचडे आदींनी दिला आहे.

तसेच अखिल सेवानिवृत्त शिक्षक संघाचे मधुकर चाफले, मुकुंद भलमे, विजय चांभारे, खंडाळे व बकाने आदींनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.





  Print






Related Photos