आरमोरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा : भाजप शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांना दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आरमोरी तालुक्याचा समावेश न झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आरमोरी तालुक्यातील प्रत्यक्ष पीक परिस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेले अतोनात नुकसान तसेच विविध नैसर्गिक संकटांचा गांभीर्याने विचार करून तालुक्याचा तातडीने दुष्काळग्रस्त किंवा आपत्तीग्रस्त यादीत समावेश करावा, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या कार्यालयाचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांना सादर केले.
स्थानिक विश्रामगृहात पार पडलेल्या या भेटीदरम्यान भाजप शिष्टमंडळाने ओएसडी पालकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व पीक नुकसानीची भीषण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर्षी तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यातच धान पिकावर तुडतुड्यासारख्या घातक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागली, ज्यामुळे उत्पादनाचा खर्च प्रचंड वाढला. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले.
परिसरातील नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने पिकांची मोठी नासधूस झाली आहे.आरमोरी तालुका हा प्रामुख्याने शेतीप्रधान असून भात हे या भागातील मुख्य पीक आहे. बहुतांश कुटुंबे शेतीवरच अवलंबून असल्याने या नुकसानीचा थेट फटका त्यांच्या उपजीविकेवर बसला आहे. निसर्गाच्या या अवकृपेसोबतच सध्या तालुक्यात हत्ती आणि वाघांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून वन्यप्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान आणि शेतकऱ्यांवरील वाढता ताण ही मोठी समस्या बनली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्यक्ष पंचनामे व वस्तुनिष्ठ पाहणी करून तालुक्याला आपत्तीग्रस्त घोषित करावे, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा होईल, असा मुद्दा शिष्टमंडळाने मांडला.
निवेदन सादर करताना माजी आमदार कृष्णाजी गजबे, भाजप जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, जिल्हा सचिव भारत बावनथडे, अक्षय हेमके, शहराध्यक्ष विलास पारधी, आदिवासी आघाडीचे महामंत्री ओमकार मडावी, माजी नगराध्यक्ष पवन नागनवरे, राहुल तितीरमारे, गोलू वाघरे, दिगंबर रणदिवे, तालुका महामंत्री जितू ठाकरे, प्रकाश लेनगुरे, रामहरी चौधरी, डॉ. बिसेन, जिल्हा सचिव किशोर ढवळे, अनिल नानावरे, योगेश कुकडकर, डॉ. कुंभरे, किरंगे कोसरी यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. शासनाने तालुक्यातील परिस्थितीचा फेरआढावा घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




