महत्वाच्या बातम्या

 आष्टीत ७० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या


- आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आष्टी : येथील बाबुराव गोंगले (वय ७०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. बाबुराव हे रोजंदारीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सकाळी बाबुराव गोंगले हे मुलाच्या दुकानात गेले होते. त्यांनी मुलाला बँकेतून पैसे काढून देण्यास सांगितले. मात्र, मुलाने त्यास नकार दिल्यानंतर बाबुराव यांनी स्वतः बँकेत जाऊन पैसे काढले.

त्यानंतर प्रकृती ठीक नसल्याचे सांगून ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते पुन्हा दुकानात गेले आणि तेथून एक रस्सी घेऊन घरी परतले. घरी आल्यानंतर त्यांची पत्नी घरात नसल्याचे पाहून त्यांनी घरातील फाट्याला गळफास घेतला.

काही वेळाने पत्नी घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बाबुराव गोंगले यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. संबंधित पोलिसांकडून घटनेची नोंद करून पुढील तपास करण्यात येत आहे.





  Print






Related Photos