अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर बैठक

- ४३०० ग्रेड पे, प्रोत्साहन भत्ता व वेळेवर वेतन देण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत अनुदानित आश्रमशाळांतील प्राथमिक शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित सेवा व वेतनविषयक प्रश्नांवर रविवार १८ ऑक्टोबर रोजी सेमाना देवस्थान येथे सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नागपूर विभागीय सचिव (अनुदानित) विकास जनबंधू होते.
बैठकीत प्राथमिक शिक्षकांना ४३०० ग्रेड पे लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १,५०० रुपये आदिवासी प्रोत्साहन भत्ता मंजूर करणे, प्रलंबित सेवा व वेतनविषयक प्रश्न निकाली काढणे आणि मासिक वेतन नियमितपणे वेळेवर देणे,तसेच अनुदानित आश्रम शाळा जपतलाई येथील कर्मचाऱ्यांचे समायोजन शासकीय किंवा अनुदानित आश्रम शाळेत करण्यात यावे या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आदिवासी प्रोत्साहन भत्त्यासाठी प्रस्ताव सादर करूनही अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तसेच वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. या सर्व प्रश्नांवर संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच प्रकल्प अधिकारी, गडचिरोली यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी भूमिका बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले विकास जनबंधू यांनी व्यक्त केली.
बैठकीला शैलेश भैसारे, संदीप भोयर, एन. पी. चंबूलवार, एस. एम. झजाळ, जे. जे. आतला, एस. पी. बोरेवार, आर.जीं तोडसाम, एम डी मत्ते, जी. एम. बोबाटे, बी. जी. जेणेकर, पी आर जुआरे, आर झेड चापले, व्ही एम. कुळमेथे, एस के.शेंडे, जी पी गुरनुले, जी आर, धाईत, ए. एन. झाडे, एम. ए. बोरेवार,यांच्यासह गडचिरोली व चंद्रपूर येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




