बल्लारपूर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई : २५.५६ लाखांचा हायवा व रेती जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विनापरवाना आणि रॉयल्टी न भरता रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर बल्लारपूर पोलिसांनी कारवाई केली. जुनोना गावातील चौकात सापळा रचून पोलिसांनी १२ चाकी हायवा ट्रक पकडला. या कारवाईत ८ ब्रास रेतीसह एकूण २५ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १९ नोव्हेंबर रोजी पहाटे करण्यात आली.
या प्रकरणी हायवा चालक मोहित विलास गज्जलवार २६ वर्षे रा. चेक बल्लारपूर, ता. पोंभुर्णा आणि हायवा मालक मनोज निखारे रा. चिंतलधाबा, ता. पोंभुर्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात २५ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक क्रं एमएच ३४ सीक्यू २६५२ आणि ५६ हजार रुपये किमतीची ८ ब्रास रेतीचा समावेश आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक रात्री गस्तीवर असताना चिचपल्ली ते जुनोना मार्गावरून रेती भरलेला हायवा येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन जुनोना चौकात सापळा रचला. काही वेळातच आसेगाव-गिलबिली मार्गाने आलेला संशयित हायवा थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा रॉयल्टी परवाना मागितला असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून वाहन व रेती जप्त केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचा नेतृत्वात महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे आणि पोलीस हवालदार यशवंत कुमरे यांनी केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Petrol Price




