शासकीय सेवेत दाखल लाभार्थ्यांच्या घरी आशिर्वादाचा दिवा

- समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांची घरभेट
- सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार शासकीय निवासी शाळेत शासन नियुक्ती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जात आशिर्वादाचा दिवा प्रज्वलीत करण्यात आला. सेवा संकल्प अभियानांतर्गत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दिवा प्रज्वलित केला व शुभेच्छा दिल्या.
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्यावतीने पुजा आनंदराव रणधीर यांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन शासकीय निवासी शाळा उमरी मेघे येथे नियुक्ती आदेश देण्यात आला. सेवा संकल्प अभियानानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार व जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी पुजा रणधीर यांच्या स्टेशन फैल येथील निवासस्थानी जाऊन आशिर्वादाचा दिप प्रज्वलीत केला.
पुजा रणधीर यांचा शासकीय सेवेचा प्रवास तिमीरातून तेजाकडे व्हावा व त्यांच्या कुटूंबियांवर झालेल्या अन्यायाविरुध्द त्यांना मानाचे स्थान देऊन त्यांचे जीवन सुखमय व्हावे याकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.
शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून घरात एक आनंदी वातावरण निर्माण झाल्याबाबत पुजा आनंदाराव रणधीर यांनी समाधान व्यक्त केले तसेच मुलांचे शिक्षण, सासू सासऱ्यांचे पालन पोषणाची जबाबदारी पार पाडण्याकरीता मला अतिशय योग्य वेळी ही नोकरी असल्याचे मनोगत व्यक्त करत याबद्दल शासनाचे आभार व्यक्त करते, असे मत पुजा रणधीर यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले.




Petrol Price




