महत्वाच्या बातम्या

 भामरागडमध्ये दारूविक्रीविरोधात ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय


- वॉर्ड क्रमांक १, २ आणि १२ मध्ये दारूविक्रीला पूर्ण बंदी; नियम मोडणाऱ्यांना १५ हजारांपर्यंत दंड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक १, २ आणि १२ मधील ग्रामस्थांनी एकत्र येत गावात दारूविक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शुक्रवारी पार पडलेल्या ग्रामसभेत गावात देशी, विदेशी तसेच मोहफुलांच्या दारूच्या विक्रीवर संपूर्ण बंदी घालण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

दारूबंदीचे नियम मोडून गावात दारूविक्री करणाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही ग्रामसभेने दिला आहे. दारूविक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गावातील सामाजिक वातावरण सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

पोलिस पाटील अविनाश सडमिक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पेसा ग्रामसभेचे सचिव चिन्नू महाका, मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके तसेच रामलू सडमिक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी दारूविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. गावातील दारूविक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.

दारूविक्री करणाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने दंड -
ग्रामसभेने दारूविक्री करणाऱ्यांसाठी दंडाची स्पष्ट तरतूद केली आहे. त्यानुसार गावात देशी, विदेशी किंवा मोहफुलांची दारू विकताना एखादी व्यक्ती प्रथमच आढळल्यास ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दारूविक्री करताना पकडल्यास १० हजार रुपये दंड, तर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास १५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तिसऱ्या वेळच्या उल्लंघनानंतर संबंधित व्यक्तीवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही ग्रामसभेने घेतला आहे.

दंड न भरणाऱ्यांवर सामाजिक निर्बंध -
दारूबंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केवळ आर्थिक दंडावरच निर्भर न राहता सामाजिक पातळीवरही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा मुजोरी करणाऱ्या व्यक्तीला गावातील कोणत्याही सामाजिक अथवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार नाही, असा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे. या निर्णयामुळे दारूविक्री करणाऱ्यांवर सामाजिक दबाव निर्माण होऊन गावातील दारूविक्रीला आळा बसेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

हेमलकसा येथेही दारूबंदीबाबत जनजागृती -
दरम्यान, हेमलकसा येथे नागरिकांना दारूविक्री बंदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दारूमुळे कुटुंबांवर आणि समाजावर होणारे परिणाम, गावपातळीवर दारूबंदीची अंमलबजावणी आणि नागरिकांची भूमिका याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

गावातील सामाजिक स्वास्थ्य आणि शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे दारूविक्रीविरोधात उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. ग्रामसभेच्या या निर्णयामुळे दारूबंदीच्या उपक्रमाला स्थानिक पातळीवर बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos