महत्वाच्या बातम्या

 सर्पदंशाने ४० वर्षीय सुरेश कुंभरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू


- लोणारा येथील घटना; अड्याळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून भंडारा शासकीय रुग्णालयात केले होते हलविले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील लोणारा येथील सुरेश जनार्धन कुंभरे ४० वर्षे यांचा सर्पदंशामुळे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. साप चावल्यानंतर त्यांना तातडीने अड्याळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सुरेश कुंभरे यांना सापाने चावा घेतला. सर्पदंश झाल्यानंतर वेळ न दवडता त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, अड्याळ येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.

भंडारा येथील रुग्णालयाच्या आकस्मिक विभागात सुरेश कुंभरे यांना दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तपासणीनंतर दुपारी १२.१५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेप्रकरणी सुरुवातीला भंडारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सर्पदंशाची घटना घडलेले ठिकाण पवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित कागदपत्रांच्या आधारे २६ ऑगस्ट रोजी पवनी पोलिस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस शिपाई गणेश किन्नाके करीत आहेत. सर्पदंशामुळे सुरेश कुंभरे यांचा झालेला आकस्मिक मृत्यू ही घटना लोणारा परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.





  Print






Related Photos