आरमोरीकरांचे रेल्वेचे स्वप्न अखेर साकार : गोंदिया-वडसा मेमू गाड्यांचा आरमोरीपर्यंत विस्तार मंजूर


- रेल्वे बोर्डाचे अधिकृत पत्र जारी
- गोंदिया, वडसा आणि चांदाफोर्टशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळल्याने परिसराच्या विकासाला मिळणार गती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : आरमोरी शहरासह संपूर्ण परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची रेल्वेसेवेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. गोंदिया–वडसा आणि वडसा–चांदाफोर्ट या दोन मेमू (MEMU) रेल्वेगाड्यांचा विस्तार थेट आरमोरी रेल्वेस्थानकापर्यंत करण्यास रेल्वे मंत्रालयाने अधिकृत मंजुरी दिली आहे. रेल्वे बोर्डाने यासंदर्भातील मंजुरीपत्र जारी केले असून, यामुळे स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांमध्ये कमालीच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरमोरी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, या भागाला रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून दीर्घकाळापासून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. केंद्र व राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आरमोरीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनुसार, गाडी क्रमांक ६८८०६ गोंदिया–वडसा मेमू आता आरमोरीपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. ही गाडी गोंदिया येथून सायंकाळी ७:१० वाजता सुटून रात्री ९:३० वाजता वडसा येथे पोहोचेल. त्यानंतर ५ मिनिटांच्या थांब्यानंतर रात्री ९:३५ वाजता वडसा येथून रवाना होऊन रात्री १०:०० वाजता आरमोरी रेल्वेस्थानकावर दाखल होईल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक ६८८०८ वडसा–चांदाफोर्ट मेमू आता थेट आरमोरीवरून सुरू होणार आहे. ही गाडी सकाळी ६:३० वाजता आरमोरी येथून सुटेल आणि सकाळी ७:०५ वाजता वडसा येथे पोहोचल्यानंतर, ७:१५ वाजता पुढे निघून सकाळी ९:५५ वाजता चांदाफोर्ट (चंद्रपूर) येथे पोहोचेल.
रेल्वे बोर्डाने या दोन्ही गाड्यांच्या विस्ताराला मंजुरी देताना शक्य तितक्या लवकर सोयीस्कर तारखेपासून ही सेवा प्रत्यक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्ष गाड्या धावण्याची तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे. या रेल्वेविस्तारामुळे शिक्षण, नोकरी, व्यापार आणि वैद्यकीय उपचारांसाठी गोंदिया, वडसा आणि चांदाफोर्ट परिसरामध्ये दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व किफायतशीर होणार आहे. तसेच, आरमोरी तालुक्याला थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक बाजारपेठेला आणि आर्थिक हालचालींना मोठी चालना मिळून परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.




Petrol Price




