महत्वाच्या बातम्या

 वन्यजीवांच्या सुरक्षित मार्गासाठी चांदा फोर्ट ते चिचपल्ली १५ किमी पदयात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी आवश्यक असलेल्या चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे मार्गावरील वन्यजीव कॉरिडॉरच्या संवर्धनासाठी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी १५ किलोमीटरची वॉक फॉर वाइल्डलाइफ कॉरिडॉर पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. चांदा फोर्ट ते चिचपल्ली या मार्गावर होणाऱ्या या पदयात्रेतून वन्यजीव कॉरिडॉर वाचवा, वन्यजीवांचे संरक्षण करा हा संदेश देण्यात येणार आहे.

हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीकडून २०१७ पासून गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे मार्गावर सातत्याने देखरेख केली जात आहे. या काळात वन्यजीवांची रेल्वे मार्गावरील हालचाल, रेल्वेच्या धडकेत होणारे वन्यजीवांचे मृत्यू तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांच्या हालचालींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.

चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे कॉरिडॉर हा महत्त्वाच्या जंगलांना जोडणारा वन्यजीवांच्या हालचालींचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. या कॉरिडॉरचे संरक्षण झाल्यास वन्यजीवांना सुरक्षितपणे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतर करता येण्यास मदत होणार असून रेल्वे अपघातांमधील वन्यजीवांचे मृत्यू कमी करण्यास हातभार लागू शकतो. सुरक्षित वन्यजीव हालचाल, कमी रेल्वे अपघात आणि जोडलेली जंगले यासाठी हा कॉरिडॉर महत्त्वाचा आहे.

या रेल्वे मार्गावर नोंदविण्यात आलेल्या वन्यजीव मृत्यूंच्या आकडेवारीत वाघ १७, भारतीय गवा २७, चितळ २६, अस्वल १५, सांबर १९, पट्टेरी तरस ४ आणि बिबट्या ७ अशा वन्यजीवांचा समावेश आहे. या नोंदींमधून रेल्वे मार्गावर वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून येते.

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या पदयात्रेतून वन्यजीव कॉरिडॉरच्या संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होऊन वन्यजीवांच्या सुरक्षित मार्गासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी केले आहे.





  Print






Related Photos