व्यापारी मंडळ व २४ तास सेवा ग्रुपच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात व्यापारी मंडळ आणि २४ तास सेवा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपालांसाठी पारंपरिक तान्हा पोळा उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला बालगोपालांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन पार्थ धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, माजी नगराध्यक्ष आहतेश्याम अली, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभिजीत मणियार, माजी नगरसेवक छोटू शेख, रवी कमल कॉन्टॅक्टचे संचालक संदेश चोरडिया, कांचणी अॅग्रोचे बालाजी धोबे, डॉ. काजल धोटे, २४ तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष स्नेहल पत्तीवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
तान्हा पोळ्यानिमित्त बालगोपालांनी आपल्या नंदीबैलांची आकर्षक आणि सुबक सजावट करून सहभाग नोंदविला. पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बालगोपालांनी सजविलेल्या नंदीबैलांसह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालगोपालांचे भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. तसेच उत्कृष्ट सजावट करणाऱ्या बालगोपालांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार आद्या शेंडे, द्वितीय पुरस्कार रुद्राक्ष क्षीरसागर, तर तृतीय पुरस्कार प्रशिक चौरे, निवांशि केशवानी आणि सोहम ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना आपल्या पारंपरिक संस्कृतीशी जोडण्याचे कार्य होत असल्याचे सांगत आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक केले. बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती रोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दत्तश्री ठाकरे, पदम झोडापे, शुभम पर्वत, लेखू केशवानी, पाऊलकर, तेजस चौधरी, सुरज मेश्राम, घोडमारे, कुंमरे, शशी ठाकरे, शरद यादव, गायत्री पेचे, अर्पिता गनवाणी तसेच २४ तास सेवा ग्रुप व व्यापारी मंडळाच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.




Petrol Price




