केंद्राच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी : महागाई भत्त्यात ९ टक्क्यांची वाढ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्र सरकारने पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगानुसार पगार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे सहाव्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी पगार घेत आहेत त्यांचा महागाई भत्ता २०३ टक्क्यांवरून २१२ टक्क्यांवर गेला आहे. डीएचे हे नवीन दर १ जुलै २०२२ पासून लागू होणार आहेत. याशिवाय पाचव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए १५ टक्क्यांनी वाढवून ३६९ टक्के केला गेला आहे. त्यांनादेखील १ जुलैपासून वाढ मिळणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळीच झाली आहे.
कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित केला जातो. उदा. जर एखाद्या केंद्रीय कर्मचार्याचे मुळ वेतन दरमहा ४३००० रुपये असेल, तर त्याला जुन्या DA (२०३ टक्के) अंतर्गत ८७,९२० रुपये मिळाले असते. परंतू आता डीए २१२ टक्के झाल्यानंतर ही रक्कम ९१, १६०रुपये होणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात सुमारे ३८०० रुपयांची वाढ होणार आहे. खर्च विभाग (DOI) ने १२ ऑक्टोबर रोजी डीए वाढीबद्दल माहिती देणारी सूचना जारी केली होती.
सातव्या वेतन आयोगानुसार पगार किंवा पेंशन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआरमध्ये ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के वाढ झाली आहे. यानंतर सहाव्या आणि पाचव्या वेतना आयोगानुसार जे कर्मचारी पगार घेतात, ते त्यांचा डीए वाढविण्याची मागणी करू लागले होते.
सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना महागाईच्या तुलनेत भत्ता देते. याला महागाई भत्ता आणि महागाई सवलत (पेन्शनधारकांसाठी) म्हणतात. केंद्र सरकार जुलै आणि जानेवारीमध्ये त्याचा आढावा घेते. कर्मचारी ज्या क्षेत्रात काम करतो त्यावर DA देखील अवलंबून असतो. शहरी भागात, निम शहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वेगवेगळा असतो. कर्मचार्याच्या मूळ वेतनाच्या आधारावर डीएची रचना केली जाते.
News - World