पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप!


- आरवट-शिवणी येथे सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा; भूजल पातळी वाढविण्यासह रब्बी पिकांना होणार लाभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पुढाकारातून चंद्रपूर तालुक्यातील आरवट-शिवणी येथे सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून जलसंधारणासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे काळाची गरज बनली आहे. भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने तहसील कार्यालय आणि चंद्रपूर महसूल मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आरवट-शिवणी परिसरातील सराई नाल्यावर वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
श्रमदानातून ५० मीटर लांबीचा बंधारा -
आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर सुमारे ५० मीटर लांब, २५ मीटर रुंद आणि २ मीटर खोल आकाराचा बंधारा श्रमदानातून उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे नाल्यातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी, परिसरातील भूजल पुनर्भरणाला चालना मिळून विहिरी आणि इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास हातभार लागू शकतो. तसेच जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने रब्बी हंगामातील पिकांसाठीही या उपक्रमाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
प्रशासनासह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग -
या जलसंधारण उपक्रमात उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार राजू धांडे, ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, पाणी फाउंडेशनचे प्रतिनिधी, स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, तलाठी अनूप वघारे आणि योगेश सागुळले यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
आरवट-शिवणी येथील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदान केले. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून जलसंधारणाच्या कामांना गती मिळत असून, गावपातळीवर पाण्याच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होत आहे.
जलसंधारणातून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न -
दुष्काळी परिस्थितीत केवळ शासकीय उपाययोजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभारणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे यासाठी अशा उपक्रमांची व्यापक अंमलबजावणी झाल्यास भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.
आरवट-शिवणी येथील वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीतून जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा केवळ शासकीय उपक्रम न राहता प्रत्येक गावाने आणि नागरिकाने स्वीकारण्याची लोकचळवळ बनावी, या दिशेने प्रशासनाच्या पुढाकारातून प्रयत्न सुरू आहेत.




Petrol Price




