सदर फ्लायओव्हरवर भीषण अपघात : अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू


- भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन दुर्घटना; रक्ताच्या थारोळ्यात आढळले दोघे, मेयोत उपचारादरम्यान मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या भीषण अपघातात एका अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे १०.४० वाजता सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सदर फ्लायओव्हरवर घडली. या दुर्घटनेत समीर मोहम्मद शाकिर शेख २० वर्षे आणि एहफाज मोहम्मद जाहिद अन्सारी १५ वर्षे दोघेही रा. शिवाजी चौक, यशोधरानगर, यांचा मृत्यू झाला.
गस्तीवरील पोलिसांना दोघे रक्ताच्या थारोळ्यात आढळले -
सदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे १०.४० वाजताच्या सुमारास पोलिस ठाण्याचे बीट मार्शल परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी एलआयसी चौकाकडून कामठीच्या दिशेने जाणाऱ्या सदर फ्लायओव्हरवर पोल क्रमांक पी-१६५ आणि पी-१६६ दरम्यान दोन युवक रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले दिसून आले.
दोन्ही युवक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर त्यांच्या शेजारी एमएच ४०, बीएम ३१९८ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. अपघाताची तीव्रता लक्षात येताच बीट मार्शलने तातडीने घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
मोबाइलवरून पटली ओळख -
अपघातग्रस्त युवकांकडे असलेल्या मोबाइलच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटविली. त्यानंतर पोलिसांनी विलंब न करता दोघांनाही उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच यशोधरानगर परिसरात शोककळा पसरली.
दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज -
भरधाव वेगात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास करण्यात येत आहे. फ्लायओव्हरवर रात्रीच्या वेळी भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका वाढत असल्याने या घटनेने वाहतूक सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या काही क्षणांच्या अपघातात एका २० वर्षीय युवकासह १५ वर्षीय मुलाचा जीव गेल्याने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




Petrol Price




