महत्वाच्या बातम्या

 माल भरताना वाहनावरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू


- कोराडीतील सुंदर बिस्किट कंपनीतील घटना; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुंदर बिस्किट कंपनीच्या आवारात मालवाहू वाहनात माल भरताना संतुलन बिघडून वाहनावरून खाली पडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बालकिशन कपूरचंद मरकाम ४३ वर्षे रा. स्मृतिनगर, कोराडी असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे कंपनी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास बालकिशन मरकाम हे कोराडी येथील सुंदर बिस्किट कंपनीच्या आवारात आयशर मालवाहू वाहनामध्ये माल भरण्याचे काम करीत होते. माल भरत असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते वाहनावरून डोक्याच्या बाजूने खाली जमिनीवर कोसळले.

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर अंतर्गत दुखापत झाली. डोक्याला जोरदार मार लागल्याने ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना मेडिकल रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये हलविले.

मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये बालकिशन मरकाम यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाही त्यांची प्रकृती गंभीरच राहिली. अखेर ५ सप्टेंबर रोजी रात्री ११.५० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोराडी पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, माल भरताना नेमक्या कोणत्या परिस्थितीत त्यांचा तोल गेला आणि अपघात कसा घडला, याबाबत पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos