दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांच्या मौखिक आरोग्यासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार


- चंद्रपूर जिल्ह्यातील ६० शाळा व वसतिगृहांमधील ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची दंत तपासणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गम, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात विशेष मौखिक आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ६० शाळा व वसतिगृहांमधील तब्बल ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची दंत व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच दंतविकारांचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.
जिल्हा मौखिक आरोग्य कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी तथा दंत शल्यचिकित्सक डॉ. संदीप पिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी केली.
या अभियानात एकूण ८ हजार ७५० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ८७१ विद्यार्थ्यांची मौखिक स्वच्छता चांगली असल्याचे आढळून आले, तर २ हजार ६५८ विद्यार्थ्यांमध्ये मौखिक स्वच्छतेचा अभाव दिसून आला. तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांमध्ये दात किडणे, दंत फ्लोरोसिस, दातांची अनियमित रचना तसेच इतर विविध मौखिक आरोग्यविषयक समस्या आढळून आल्या. या निष्कर्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दातांच्या स्वच्छतेबाबत नियमित काळजी घेण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
दंत आरोग्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -
तपासणीसोबतच विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. डॉ. संदीप पिपरे यांनी विद्यार्थ्यांना दुधाचे दात आणि कायमस्वरूपी दात, दातांची रचना व कार्य, दात किडण्याची कारणे, हिरड्यांचे आजार, प्लाक व कॅल्क्युलस तसेच दंत फ्लोरोसिस याबाबत सविस्तर माहिती दिली.
याशिवाय दात घासण्याची योग्य पद्धत, फ्लोराइडयुक्त टूथपेस्टचा वापर, संतुलित आहार आणि नियमित दंत तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. तंबाखू व खर्रा सेवनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य लक्षणे याबाबतही विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर -
ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांना दंतविकारांसाठी वेळेवर तपासणी आणि उपचार घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरोग्यसेवा थेट विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंत पोहोचविणे, दंतविकारांचे प्राथमिक अवस्थेत निदान करणे आणि गरजेनुसार पुढील उपचारांसाठी पाठपुरावा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
आगामी काळात विद्यार्थ्यांची नियमित दंत तपासणी, निदान झालेल्या विकारांवरील उपचारांची पूर्तता, शाळास्तरीय आरोग्य शिक्षण आणि तंबाखूमुक्तीविषयक जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संदीप पिपरे यांनी दिली.
वैद्यकीय पथकाचा सहभाग -
या अभियानात कर्मवीर सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. रवींद्रकुमार गेडाम, डॉ. दीपशिखा मुसळे, डॉ. रश्मी डोंगरवार, डॉ. नमिता कांबळे, डॉ. स्मिता दास, डॉ. लक्ष्मी गहुकार, डॉ. भाग्यश्री बचाटे, डॉ. निशू अग्रवाल, डॉ. शिवानी बोंगिरवार, डॉ. अपूर्वा रामटेक, डॉ. निखिल शास्त्रकार आणि डॉ. अथर्व बेले यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी शाळास्तरावर राबविण्यात आलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून, मौखिक आरोग्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच योग्य सवयी निर्माण करण्यास मदत होणार आहे.




Petrol Price




