महत्वाच्या बातम्या

 गोविंदपुरात औषधी वनस्पतींची लागवड


- कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम; तुळशीच्या औषधी महत्त्वाबाबत जनजागृती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : येथील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गोविंदपूर गावात तुळशीसह औषधी वनस्पतींच्या लागवडीचा उपक्रम उत्साहात राबविला. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड तसेच तुळशीच्या औषधी महत्त्वाबाबत जनजागृती करण्यात आली. उपक्रमाची सुरुवात गोविंदपूर येथील स्थानिक अंगणवाडी परिसरात तुळशीचे रोप लावून करण्यात आली. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंगणवाडीतील लहान मुलांशी संवाद साधत तुळशीचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तिचे विविध औषधी गुणधर्म आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले योगदान याबाबत सोप्या व समजण्यासारख्या भाषेत माहिती दिली.

लहान मुलांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी आणि वृक्षसंवर्धनाची सवय बालपणापासून लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर गोविंदपूर येथील जिल्हा परिषद शाळा तसेच शिवानी आश्रमशाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत रोपांची लागवड करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. केवळ वृक्षलागवड करून न थांबता लावलेल्या रोपांची नियमित देखभाल, पाणी देणे आणि त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

तुळस ही भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेली वनस्पती असून तिचा उपयोग पारंपरिक पद्धतीने विविध कारणांसाठी केला जातो. त्यामुळे तिच्या लागवडीबरोबरच औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज विद्यार्थ्यांनी अधोरेखित केली. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या विविध वनस्पतींचे औषधी महत्त्व जाणून घेऊन त्यांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे शाळकरी विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके आणि ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक संदेश पोहोचला. शिक्षणासोबतच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे आणि ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाची चळवळ बळकट करणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.





  Print






Related Photos