मूल पोलिसांची धडक कारवाई : २४ गोवंशांची सुटका, ८ पिकअपसह ४५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशाची अमानुष व अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मूल पोलिसांनी धडक कारवाई करत २४ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली आठ बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली असून, एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मूल पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मौजा बॅबाळ चौकीसमोरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान आठ बोलेरो पिकअप वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये एकूण २४ गोवंश जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता तसेच त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने वाहतूक केली जात होती. ही जनावरे कत्तल व विक्रीच्या उद्देशाने नेली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या कारवाईत ५ लाख ५५ हजार रुपये किमतीचे २४ गोवंश बैल तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ४० लाख रुपये किमतीची आठ पिकअप वाहने असा एकूण ४५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महेश देवीदास फटींग ३७ वर्षे रा. कुंझा, किशोर सेवक नागपुरे ३८ वर्षे रा. बोंडेगाव, विक्की धनपाल देशमुख २८ वर्षे रा. वेडवा, अंकुश देवराव मेंढुले ४८ वर्षे रा. पवनी, दिपक यादव चुनरी ४२ वर्षे रा. व्याहाड खुर्द, दिपक योगराज कांबळे २५ वर्षे रा. किटाळी, दिगंबर मंगरू मुनघाटे ३६ वर्षे रा. आंबेशिवणी आणि राहुल मोरेश्वर चौधरी ३६ वर्षे रा. चकपिरंजी यांच्याविरुद्ध मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५(क), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(डी)(एच) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि सुरेश कन्नाके, पोउपनि रूपेश कुंभरे, पोउपनि उमेश पिपरे, पोउपनि व्यंकटेश दोनोंडे, पोहवा इंदल राठोड, पोहवा सुनिल कुळमेथे, पोअं दिलीप आदे, पोअं नरेंद्र वाकडे, पोअं प्रकाश चिकराम, पोअं शंकर बोरसरे, पोअं प्रमोद सावसाकडे यांनी केली आहे. यांच्यासह पोलीस ठाणे मूलच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.




Petrol Price




