पतीच्या डोळ्यांदेखत वाघाचा पत्नीवर हल्ला: वाचविण्याचा प्रयत्न ठरला निष्फळ, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या पत्नीच्या साथीने आयुष्याचा संसार फुलविला, तिच्यावर काळाने पतीच्याच डोळ्यांदेखत घाला घातला. डोळ्यांसमोर पत्नीवर वाघाने हल्ला केला, तिला जंगलाच्या दिशेने ओढत नेले; पतीने आरडाओरड करून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र नियतीच्या क्रूर घावापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. वाघाच्या हल्ल्यात उषा अंकुश गुरुनुले ४५ वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात शुक्रवारी १६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
उषा गुरुनुले या सोयाबीन कापणीचे काम आटोपून घरी परतल्या होत्या. त्यानंतर पती अंकुश गुरुनुले यांच्यासोबत त्या धान पिकाला पाणी देण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेल्या. पती डिझेल इंजिनजवळ पाण्याची व्यवस्था करीत होते, तर उषा शेतातील तण काढण्याचे काम करीत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
वाघाने उषा यांना पकडून जवळच्या जंगलाच्या दिशेने ओढत नेले. पत्नीवर झालेला हल्ला पाहून पती अंकुश यांनी आरडाओरड केली; मात्र वाघाने त्यांच्या मानेचा चावा घेतल्याने उषा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही क्षणांपूर्वी सोबत असलेली जीवनसाथी अचानक कायमची दुरावल्याने गुरुनुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५५९, पीएफ १००० परिसरात घडली.या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मृत महिलेच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जाणारे वाहन अडविले. मागणी मान्य झाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
पतीच्या डोळ्यांदेखत पत्नीचा झालेला दुर्दैवी अंत आणि एका कुटुंबाचा हरपलेला आधार यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




Petrol Price




