ढाब्यात घुसून दुचाकी पेटवली : मी या परिसरातील दादा म्हणत तरुणाला जीवे मारण्याची धमकी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील राधा-कृष्ण ढाब्यात घुसून पेट्रोल टाकून दुचाकी पेटविल्याची घटना गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकी जळून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. यावेळी आरोपीने ढाबा चालकाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दिपेश रामखिलावन यादव २३ वर्षे रा. शिवाजी वॉर्ड, बल्लारपूर आणि त्याचा मोठा भाऊ दीपक यादव हे मागील १५ वर्षांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील राधा-कृष्ण ढाबा चालवितात. गुरुवारी दीपक यादव ढाब्यावर उपस्थित असताना सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी साहिल सिंह रा. बायपास चौक, लालपेठ, चंद्रपूर हा ढाब्यात आला. त्याने सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल ढाब्याच्या आवारात उभ्या असलेल्या एफझेड कंपनीच्या दुचाकीवर ओतले आणि लायटरने आग लावली. दुचाकी पेटविल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला.
यावेळी आरोपीने दीपक यादव याला शिवीगाळ करीत, तू मला ओळखत नाही का? मी या परिसरातील दादा आहे. या परिसरात माझी दहशत आहे, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, घटनेपूर्वी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास आरोपीने फोन करूनही शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. या आगीत एमएच ३४ सीए २३७७ क्रमांकाची निळ्या-लाल रंगाची दुचाकी जळून सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दिपेश यादव याने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपी साहिल सिंह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.




Petrol Price




