अचानक रेल्वे डब्यात पोलिसांचा शिरकाव : श्वान पथकासह झाडाझडती, अमली पदार्थ तस्करांची धाकधूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नेहमीप्रमाणे बल्लारपूर रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेश एक्सप्रेस थांबली आणि प्रवाशांची लगबग सुरू होती. मात्र, काही क्षणांतच रेल्वे डब्यांमध्ये पोलिसांचे पथक अचानक दाखल झाले. त्यांच्यासोबत प्रशिक्षित श्वान पथकही होते. पोलिसांच्या अचानक प्रवेशामुळे प्रवाशांमध्ये कुतूहल निर्माण झाले, तर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांची धाकधूक वाढली.
बुधवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजताच्या सुमारास बल्लारपूर रेल्वे स्थानकावर चंद्रपूर पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक शोधमोहीम राबविली.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक, जिल्हा पोलीस श्वान पथक तसेच जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने आंध्र प्रदेश एक्सप्रेस २०८०५ ला लक्ष्य केले. रेल्वेतील स्लीपर आणि जनरल कोचमध्ये पोलीस पथक पोहोचताच प्रवाशांच्या सामानाची बारकाईने तपासणी सुरू झाली. श्वान पथकातील अर्जुन आणि मंगल या प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने प्रत्येक संशयास्पद वस्तू आणि सामानाची तपासणी करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे रेल्वे डब्यांमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
अमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला. तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अमली पदार्थ आढळून आला नाही. मात्र, रेल्वे मार्गाचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी अशा संयुक्त शोधमोहिमा नियमितपणे राबविण्याची तयारी पोलिसांनी ठेवली आहे. रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसोबतच अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता रेल्वे मार्गावरही आपली नजर अधिक तीक्ष्ण केली आहे.




Petrol Price




