महत्वाच्या बातम्या

 मुरूमगावात शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला : ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी


- शेताकडे जात असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने केला अचानक हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : शेतात काम करण्यासाठी जात असलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी तालुक्यातील मुरूमगाव येथे घडली. या हल्ल्यात झिंगा पांडू पोटावी ६५ वर्ष  हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरूमगाव येथील रहिवासी झिंगा पांडू पोटावी हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे कामासाठी जात होते. शेताकडे जाणाऱ्या मार्गावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोटावी यांना बचावाची संधी मिळाली नाही. अस्वलाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमी झिंगा पोटावी यांना तातडीने उपचारासाठी मुरूमगाव आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धानोरा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुरूमगाव परिसरात वन्यप्राण्यांची दहशत -
मुरूमगाव परिसरात गेल्या काही काळापासून अस्वलांसह बिबट्यांचाही वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात काम करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना वन्यप्राण्यांचा धोका निर्माण झाला असून, विशेषतः सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने या परिसरात नियमित गस्त वाढवावी, तसेच वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीकडे होणारा वावर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदतीची मागणी -
अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या झिंगा पांडू पोटावी यांच्या उपचारासाठी वनविभागाने तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने परिसरात गस्त वाढवून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos