पाच वर्षांत आश्रमशाळांमधील १ हजार १४४ विद्यार्थ्यांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये 680 तर अनुदानित आश्रम शाळांमध्ये 464 म्हणजेच एकूण 1144 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या पाच वर्षांत घडल्या. त्या घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष बैठक बोलवा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी केली आहे.
त्यासंदर्भात त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे.
एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास विभागातून माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळवली आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात विद्यार्थ्यांचे हे मृत्यू धक्कादायक आहेत. गळफास घेणे, अपघात होणे, पाण्यात बुडणे, सर्पदंश, विजेचा धक्का बसणे, विषप्राशन करणे, अन्नातून विषबाधा होणे, भाजणे अशा विविध कारणाने हे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱहे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना लेखी निवेदनाद्वारे विशेष बैठक घेण्याची मागणी केली आहे. या बैठकीत वरील सर्व गोष्टींचा आढावा घेता येईल व आवश्यक उपाययोजना आखता येतील, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या मुद्दय़ांकडे लक्ष वेधले
- 2017 ते सन 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत किती आश्रमशाळांना मंजुरी देण्यात आली व किती आश्रमशाळा बंद झाल्या.
- आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या किती होती?
- 2019-20मध्ये असलेल्या कोविड आजाराच्या साथीच्या काळात आश्रमशाळा बंद होत्या का?
- विद्यार्थी घरी असताना झालेल्या मृत्यूची आकडेवारी यामध्ये गृहीत धरण्यात आली आहे काय?
- कोणत्या घटना टाळता आल्या असत्या? त्यासाठी शासनाने कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या?
- या मृत्यूंची उच्च स्तरावरून चौकशी केली का?
- मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कोणती मदत देण्यात आली?
- कोणत्या स्वरूपाचे धोरण आखण्यात आले आहे?
- केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे का?
News - Rajy