बिबट्याच्या दहशतीपासून सुटका : अखेर पिंजऱ्यात जेरबंद


- कोंबडीच्या आमिषाला भुलला; बोहुंदा परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : एनएनटीआरच्या जंगलाला लागून असलेल्या बोहुंदा गाव व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. शेळीचे आमिष नाकारत कोंबडीच्या आमिषाला भुललेल्या बिबट्याने कोंबड्या ठेवलेल्या पिंजऱ्यात प्रवेश केला आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना तो त्यात अडकला. शुक्रवारी पहाटे ही कारवाई यशस्वी झाली. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
बोहुंदा गाव एनएनटीआरच्या जंगलाला लागून असून हा परिसर बफर झोनमध्ये येतो. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा गाव व परिसरात सातत्याने वावर होता. रात्रीच्या वेळी गावाजवळ येऊन बिबट्या शेळ्या तसेच कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना भक्ष्य बनवत होता. वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळनंतर अंधार पडल्यावर घराबाहेर पडण्यासही नागरिक धजावत नव्हते. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे त्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत वनविभागाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी विशेष रेस्क्यू मोहीम हाती घेतली.
दोन पिंजरे, ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर -
वनविभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले. तसेच त्याच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली. बिबट्याला पिंजऱ्यात आकर्षित करण्यासाठी एका पिंजऱ्यात शेळी, तर दुसऱ्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. या मोहिमेत आरएफओ आयशा लांबट, क्षेत्र सहायक एल. एस. अग्निहोत्री, वनरक्षक रणजित पटले, पी. एस. बिसेन, किशोर काले, उदय राऊत तसेच आरआरटीच्या पथकाने संयुक्तपणे सहभाग घेतला.
शेळीच्या आमिषाला हुलकावणी -
गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री बिबट्या प्रथम शेळी ठेवलेल्या पिंजऱ्याजवळ आला. मात्र, त्याने शेळीचे आमिष स्वीकारले नाही आणि तेथून निघून गेला. वनविभागाचे पथक बिबट्याच्या पुढील हालचालींवर लक्ष ठेवून होते. काही वेळाने बिबट्या पुन्हा परिसरात परतला. यावेळी कोंबड्यांच्या आमिषाने त्याचे लक्ष वेधले. कोंबड्यांना भक्ष्य करण्याच्या प्रयत्नात बिबट्या पिंजऱ्यात शिरला. मात्र, बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना तो पिंजऱ्यात अडकला.
पहाटे बिबट्या जेरबंद झाल्याचे स्पष्ट -
शुक्रवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच वनविभाग आणि आरआरटीचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला कोणतीही इजा होणार नाही, याची दक्षता घेत त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कार्यवाही करून बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी एनएनटीआरच्या जंगल परिसरात नेण्यात आले. त्यामुळे गाव व परिसरात निर्माण झालेला संभाव्य धोका टळला आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी -
या रेस्क्यू ऑपरेशनला बोहुंदा येथील महेश मारगाये, अनिल पटले आणि हितेश बिसेन यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केले. वनविभाग आणि आरआरटीच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या कारवाईला ग्रामस्थांच्या सहकार्याची जोड मिळाल्याने बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करणे शक्य झाले. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या बोहुंदा परिसरातील नागरिकांना या कारवाईनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, वनविभागाच्या तत्पर कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत आहे.




Petrol Price




