महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील युवकांना पंतप्रधानांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी


- विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७ ला सुरुवात; युवकांसाठी विकसित भारत क्विझ

- ३० सप्टेंबरपर्यंत विकसित भारत क्विझमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७ या राष्ट्रीय उपक्रमाला विकसित भारत क्विझच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. या उपक्रमातून गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना नेतृत्वगुण, नवकल्पना आणि विकासाभिमुख संकल्पना राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी मिळणार असून, विविध टप्प्यांतून निवड झालेल्या युवा प्रतिनिधींना पंतप्रधानांसमोर विकसित भारतासाठी आपल्या कल्पना व संकल्पना मांडता येणार आहे.

या राष्ट्रीय उपक्रमाची अंतिम फेरी १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातून विविध टप्प्यांतून निवड झालेल्या युवा प्रतिनिधींना या राष्ट्रीय युवा नेतृत्व संवादात सहभागी होता येणार आहे.

विकासाच्या दहा विषयांवर युवक मांडणार कल्पना -
विकसित भारत चॅलेंजअंतर्गत देशाची विविधता आणि प्रादेशिक विकासाच्या गरजा लक्षात घेऊन दहा विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये भविष्यातील प्रशासन, हवामान सुरक्षा, लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, शाश्वत औद्योगिकीकरण, कनेक्टिव्हिटी, उत्पादन क्षेत्र, आदिवासी नेतृत्व, नवकल्पना, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि ब्लू इकॉनॉमी या विषयांचा समावेश आहे.

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना स्थानिक विकासाच्या गरजा व आव्हाने, आदिवासी भागातील विकास, दळणवळण, तंत्रज्ञान, उद्योग, पर्यावरण तसेच त्यावरील नाविन्यपूर्ण उपाय राष्ट्रीय स्तरावर मांडण्यासाठी या उपक्रमातून महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

क्विझपासून राष्ट्रीय युवा नेतृत्व संवादापर्यंत पाच टप्पे -
विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७ अंतर्गत निवड प्रक्रिया पाच टप्प्यांत होणार आहे. त्यामध्ये विकसित भारत क्विझ - विकसित भारत निबंध स्पर्धा - जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप - राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद  - राष्ट्रीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७  या टप्प्यांचा समावेश आहे.

विकसित भारत क्विझ १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६, विकसित भारत निबंध स्पर्धा ५ ते १९ ऑक्टोबर २०२६, जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप १० ते १६ नोव्हेंबर २०२६, तर राज्य/केंद्रशासित प्रदेशस्तरीय विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७  १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील विकसित भारत युवा नेतृत्व संवाद १० ते १२ जानेवारी २०२७ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत विकसित भारत क्विझमध्ये सहभागी होऊन या राष्ट्रीय युवा नेतृत्व उपक्रमाचा भाग व्हावे आणि आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन युवा भारत चे सारंग मेश्राम यांनी केले आहे.





  Print






Related Photos