महत्वाच्या बातम्या

 मतदारांनी प्रारुप यादीत नावे तपासून आक्षेप, हरकती असल्यास दाखल करावे : आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी


- मतदार यादी निरिक्षकांनी घेतला एसआयआरचा आढावा

- प्रारुप मतदार यादी सर्वच ठिकाणी प्रसिध्द करण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / वर्धा : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. एकही पात्र मतदार यादीतून वगळू नये यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीत मतदारांनी आपली नावे तपासावी. त्यात काही दुरुस्ती, बदल, समावेश असल्यास तसे आक्षेप, हरकती मुदतीत सादर करावे. राजकीय पक्षांनी देखील यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्रीमती बिदरी यांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावीत, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

मतदार यादी अधिकाधिक शुद्ध, अद्ययावत करण्याचे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणी प्रमाणे मतदार यादीचे प्रारुप तयार करून प्रसिध्द करण्यात आले आहे. ही यादी जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी कार्यालये तसेच ग्रामपंचायत स्तरावर प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदारांनी आपले नाव यादीत असल्याची खात्री करावे. नावात, मतदान केंद्रात किंवा अन्य बदल असतील किंवा नव्याने नाव समाविष्ठ करावयाचे असल्यास आवश्यक नमुन्यातील अर्ज भरून दावे सादर करावे, असे बिदरी म्हणाल्या.

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. विशेषत महिला, दिव्यांग, पारधी बेडा, बंजारा तांडा, भटक्या समाजातील नागरिकांचे वास्तव्य असलेली ठिकाणे अशा ठिकाणी प्राधान्याने शिबिरे घेण्यात यावी. कुटुंबातील सर्वच व्यक्तींची नावे एका मतदान केंद्रावर राहतील, असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यानंतर दाखल होणारे दावे, हरकतींवर गतीने आणि स्थानिक स्तरावरच सुनावणी घेण्याच्या सूचना मतदार यादी निरिक्षकांनी केल्या.

सुरुवातीस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी प्रारूप मतदार यादीची माहिती दिली. या यादीत ९ लाख ५९ हजार ६४ मतदारांचा समावेश आहे. १ लाख ७८ हजार १७८ मतदारांचे अर्ज विविध कारणाने जमा होऊ शकले नाही. नव्या रचनेप्रमाणे जिल्ह्यात १ हजार ३१३ मतदान केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक -
मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत देखील बैठक घेतली. सर्व पक्षांना प्रारूप मतदार यादी देण्यात आली आहे. पक्षांनी यादीचे निरिक्षण करून यादी अधिक उत्तम करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. प्रारूप यादीवर सादर होणारे दावे, हरकतींवर सुनावणी घेतांना राजकीय पक्ष, बीएलएंनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा करत त्यावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.





  Print






Related Photos