अयोध्येतील मंदिराचे काम ४० टक्के पूर्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / उत्तरप्रदेश : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर पडदा पडल्यानंतर राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरूवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती.
त्यानंतर मंदिराच्या कामाने वेग पकडला. नुकतेच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून शेअर प्रस्तावित मंदिराचे आणि सुरू असलेल्या कामाचे फोटो शेअर करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये मंदिराचे अद्भुत रूप आपल्याला दिसते.
आतापर्यंत मंदिराची उंची जमिनीपासून 30 फुटांपर्यंत झाली आहे. मंदिरामध्ये 392 खांब लावण्यात येणार आहे. या सर्व खांबावर 16-16 मूर्ती कोरण्यात येणार आहे. या खांबांची उंची 19.11 फूट असणार आहे. याआधी 5 ऑगस्ट रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मंदिराचे काम 40 टक्के पूर्ण झाल्याचे म्हटले होते. आगामी 1-2 वर्षात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव आणि श्री राम मंदिर बांधकाम समितीचे विद्यमान अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंदिराचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले होते. पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट डिसेंबर 2023 हे आहे. ते पूर्ण झाले की आम्हाला गाभाऱ्यात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची स्थापना करण्याची अपेक्षा आहे. यासाठी फेब्रुवारी 2022 मध्ये ग्रॅनाइट दगडानेच प्लिंथचे बांधकाम सुरु झाले आहे. प्लिंथच्या बांधकामासाठी 5 फूट x 2.5 फूट x 3 फूट आकाराचे सुमारे 17,000 दगड वापरण्यात आले आहेत. यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून उत्तम दर्जाचे दगड आणले आहेत.
दुसऱ्या टप्प्यात तळमजला आणि पाच मंडपांचा समावेश आहे. हा टप्पा दोन मजल्यांचा आहे. तो डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये राजस्थान बन्सी पहारपूर दगड कोरलेले असतील. हे काम सुरू झालेले आहे. मंदिरातील सुपर स्ट्रक्चरसाठी सुमारे 4.45 लाख सीएफटी दगडांची आवश्यकता आहे. डिसेंबर 2025 पर्यंत, 71 एकरचा मंदिर परिसर पूर्ण होईल, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.
News - World