जागतिक हृदय दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : डोंट मिस अ बीट या यंदाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत विद्यार्थी आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांसाठी जागतिक हृदय दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंह पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार, नाक, कान, घसा शल्य चिकित्सक डॉ. मांडपे, एनसीडी कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.माधुरी निमसटकर, ऑडिओलॉजिस्ट सुमेध शंभुकर, श्रध्दा काकपुरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जागतिक श्रवण दिन आणि सर्पदंशबाबत एक विशेष जनजागती मोहिम देखील राबविण्यात आली.
हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. आहारात उच्च फायबरयुक्त आणि कमी चरबी व साखरेच्या पदार्थाचा समावेश करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. कॅलरीज बर्न करण्यासाठी दररोज किमान ३०मिनीटे नियमित व्यायाम करणे, तंबाखू व मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहणे निरोगी हृदयासाठी आवश्यक आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित वैद्यकीय तपासणी व उपचारांचे तंतोतंत पालन करावे, असे यावेळी सांगण्यात आले.
सर्पदंशाबाबतचे गैरसमज दूर करतांना ३० ते ३५ टक्के साप विषारी असतात. त्यामुळे रुग्णांना मानसिक आधार देणे ही पहिली पायरी आहे. सर्पदंश झाल्यास कटींबंधन बांधणे, विष तोंडाने चोखणे किंवा जखम करणे हे प्रकार टाळावेत. रुग्णाची हालचाल कमी ठेवावी आणि विष पसरवण्यापासुन रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात लवकरात लवकर प्रतिविष देऊन रुग्णांना पुढील उपचारांसाठी उच्च केंद्रात हलवावे, असे आवाहन डॉ. चरडे यांनी केले असल्याचे सामान्य रुग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.




Petrol Price




