चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांवर निर्बंध : पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचे आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.
हे आदेश २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन होणार असल्याने उत्सव मंडळे, आयोजक तसेच नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, अत्यंत तीव्र फ्लॅश लाईट तसेच मानवी डोळ्यांवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या प्रकाशयंत्रणांच्या वापरावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीतील प्रकाशयंत्रणांची पोलीस अधिकारी किंवा सक्षम प्राधिकारी तपासणी करू शकतील. धोकादायक प्रकाशयंत्रणा आढळल्यास ती तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात.
सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर किंवा अॅम्प्लीफायर वापरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, मॉडिफाइड साउंड इक्विपमेंट, वुफर आणि सबवूफर यांसारख्या अत्यंत तीव्र व हानीकारक ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी राहणार आहे.
रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये आदी घोषित शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीच्या मर्यादांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. तसेच रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या वापरास सक्त मनाई राहील. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सूट दिलेले दिवस व वेळ याला अपवाद राहतील.
ध्वनीची मर्यादा क्षेत्रानुसार निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ व रात्री ७० डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रात दिवसा ६५ व रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ व रात्री ४५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात दिवसा ५० व रात्री ४० डेसिबलची मर्यादा राहणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ७० अन्वये ध्वनी व प्रकाशयंत्रणा जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. आयोजक, डीजे ऑपरेटर किंवा वाहनचालकाविरुद्ध कलम ७२(२) अन्वये वारंटशिवाय अटक करण्याची तरतूद असून, कलम १३४ व १३६ अन्वये न्यायालयीन कारवाईही केली जाऊ शकते.
आगामी सण-उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावेत, यासाठी सर्व उत्सव मंडळे, आयोजक आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.




Petrol Price




