बल्लारपूरचे दुचाकी चोरटे लॉरेन्स आणि बिसलरी एलसीबीच्या जाळ्यात : दोघे ताब्यात, एक फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) चंद्रपूर पथकाने बल्लारपूर येथील लॉरेन्स आणि बिसलरी या दोघांना ताब्यात घेतले, तर त्यांचा तिसरा साथीदार फरार आहे. या कारवाईत चोरीची बजाज पल्सर मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. १८ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरातील वेकोलि पंखा परिसर, मूल रोड येथे एलसीबीच्या वरोरा पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरोरा पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये लॉरेंस ऊर्फ इशू जॉर्ज दास २१ वर्ष , रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपूर आणि निखील ऊर्फ बिसलरी रामराकेश निषाद (वय १९), रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर एनएस १२५ मोटारसायकल (एमएच ३४ सीएफ ३९९३) आणि ५० हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा मोपेड (एमएच ३४ सीयू १२८२) जप्त करण्यात आली.
या प्रकरणातील लवकुश ऊर्फ डू उमेश निषाद २४ वर्ष , रा. भगतसिंग वार्ड, बल्लारपूर हा तिसरा आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईमुळे वरोरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अप. क्र. १०३९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा पथकाने केली.




Petrol Price




