महत्वाच्या बातम्या

 पुरुषांच्या सहभागातून निरोगी कुटुंबाचा संकल्प : चंद्रपूर जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवडा


- ४ डिसेंबरपर्यंत मोहीम; एनएसव्ही शस्त्रक्रियेबाबत जनजागृती आणि पात्र लाभार्थ्यांना आरोग्य सेवा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंब नियोजन ही निरोगी, आनंदी आणि स्थिर कुटुंबव्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब असून, त्याची जबाबदारी केवळ महिलांवर न ठेवता पुरुषांनीही समान सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने पुरुषांचा कुटुंब नियोजनातील सहभाग वाढविण्यासह पुरुष नसबंदी या सुरक्षित व प्रभावी पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुरुष नसबंदी पंधरवडा राबविण्यात येत आहे. स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार हे यावर्षीच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे.

ही मोहीम दोन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २१ ते २७ नोव्हेंबरदरम्यान संपर्क सप्ताह आयोजित करण्यात आला असून, या कालावधीत पुरुष नसबंदीबाबत जनजागृती, पात्र लाभार्थ्यांची ओळख, समुपदेशन आणि जनसंपर्क उपक्रम राबविण्यात येत आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरदरम्यान सेवा सप्ताह आयोजित करण्यात येणार असून, या काळात पात्र लाभार्थ्यांना पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पुरुष नसबंदीची एनएसव्ही (नॉन स्कॅल्पेल व्हॅसेक्टॉमी) ही सुरक्षित, सोपी आणि प्रभावी शस्त्रक्रिया पद्धत आहे. या प्रक्रियेमध्ये विशेष तंत्राचा वापर करून लहान छेदाशिवाय शस्त्रक्रिया केली जाते. प्रशिक्षित व तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाते. शस्त्रक्रियेनंतर आवश्यक वैद्यकीय सल्ला आणि अल्प विश्रांती घेतल्यानंतर लाभार्थी आपल्या दैनंदिन कामकाजाला पुन्हा सुरुवात करू शकतो. या पद्धतीमुळे पुरुषांच्या शारीरिक क्षमतेवर, लैंगिक क्षमतेवर किंवा सामान्य वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होत नाही. त्यामुळे पुरुष नसबंदीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून या सुरक्षित पद्धतीविषयी जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर आवश्यक समुपदेशन व वैद्यकीय मार्गदर्शनही केले जाणार आहे. याशिवाय कुटुंब नियोजनात पुरुषांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि शासनाच्या नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मोबदला देणे, हीदेखील मोहिमेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पुरुष नसबंदीविषयी माहिती, मार्गदर्शन, समुपदेशन आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधून या सुविधांचा लाभ घ्यावा.

कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पती-पत्नी दोघांचीही समान जबाबदारी आहे. कुटुंबाचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक प्रगती लक्षात घेता पती-पत्नीने परस्पर संमतीने व योग्य वैद्यकीय सल्ल्यानुसार कुटुंब नियोजनाचा निर्णय घ्यावा. पुरुषांनी पुढाकार घेऊन पुरुष नसबंदी पंधरवड्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.





  Print






Related Photos