महत्वाच्या बातम्या

 पांढरकवड्याच्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जाय आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश


- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेंतर्गत मान्यताय मंदिर परिसराच्या विकासासह भाविकांना मिळणार सुविधा
 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ऐतिहासिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिराला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजनेंतर्गत ‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा अधिकृत दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून भाविकांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या यात्रास्थळाला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

पांढरकवडा येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर हे परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून विविध धार्मिक पर्व, उत्सव आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर परिसरात अधिक चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी या मंदिराला यात्रास्थळाचा दर्जा मिळावा आणि शासनाच्या विकास योजनांचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

आता शासनाच्या निर्णयानुसार मंदिराला ‘ब’ वर्ग यात्रास्थळाचा दर्जा प्राप्त झाल्याने परिसराच्या विकासासाठी शासकीय निधी उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. याअंतर्गत मंदिर परिसरातील रस्त्यांची सुधारणा, पाणीपुरवठा, स्वच्छता, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच इतर मूलभूत पायाभूत कामे मार्गी लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे दूरवरून येणार्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल.

या निर्णयाचा लाभ केवळ मंदिर आणि भाविकांपुरता मर्यादित राहणार नसून स्थानिक गावाच्या विकासालाही चालना मिळणार आहे. यात्रेच्या निमित्ताने परिसरात वाढणारी भाविकांची वर्दळ स्थानिक व्यावसायिक, लघुउद्योजक आणि सेवा पुरविणार्या नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यास पूरक ठरणार आहे. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासालाही यामुळे गती मिळू शकते.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार व्यक्त केले आहेत. शासनाने या ऐतिहासिक पंचमुखी हनुमान मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा देऊन भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान केला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्याला समृद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन करण्यासोबतच धार्मिक स्थळांवर भाविकांसाठी दर्जेदार सुविधा निर्माण व्हाव्यात, स्थानिक पर्यटनाला चालना मिळावी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला हातभार लागावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.





  Print






Related Photos