जुन्या विहिरींची दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण करण्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे निर्देश


- पाणी टंचाई संदर्भात १३ नगर परिषद पंचायतींचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठ्याशी संबंधित सर्व उपाययोजनांना गती द्यावी. जुन्या विहिरींची दुरुस्ती, पाणीपुरवठा योजनांचे बळकटीकरण, हातपंप व दुहेरी पंप यंत्रणेची दुरुस्ती, नवीन पाईपलाईन टाकणे तसेच लघु पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवन येथे पाणीपुरवठा टंचाईच्या अनुषंगाने नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांनी संबंधित नगरपालिकांमधील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. उमरेड, बेसा, बहादुरा, बिडगाव, हिंगणा, नीलडोह, डिगडोह, कोंढाळी, कामठी, वाडी, मोवाड, कांद्री आणि काटोल येथील पाणीपुरवठा व इतर व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी नगर विकास विभागाचे सहआयुक्त विनोद जाधव तसेच नगर परिषद व पंचायतीचे अध्यक्ष, सभापती, मुख्याधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांवर चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करून नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. संबंधित नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांनी पाणीपुरवठ्याबाबत मांडलेल्या अडचणी तसेच सूचनांवर संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. पाणीटंचाई निवारणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.




Petrol Price




