महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत वेकोलि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू : मित्र गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / चंद्रपूर : ड्युटी आटोपून मोटारसायकलने गावाकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वेकोलि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ७.५० वाजता रामपूर ते माथरा मार्गावरील फॉरेस्ट गेटजवळ घडला. सुधाकर सिताराम उलमाले ५६ वर्षे रा. चिंचोली खुर्द असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, रविंद्र संभाजी हिंगाने ५८ वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत.

सुधाकर उलमाले हे वेकोलिच्या गोवरी डीप येथे कार्यरत होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मोटारसायकलने ड्युटीवर गेले होते. दिवसभराची ड्युटी आटोपल्यानंतर ते मित्र रविंद्र हिंगाने यांच्यासह मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ सीएस ४७६५ ने चिंचोलीकडे परतत होते. रामपूर ते माथरा मार्गावरील फॉरेस्ट गेटजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, सुधाकर उलमाले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सुधाकर यांचा मृत्यू झाला होता.

या अपघातात रविंद्र हिंगाने यांनाही जबर मार लागला. त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेने चिंचोली खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या सुधाकर उलमाले यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.





  Print






Related Photos