महत्वाच्या बातम्या

 चुरचुरा परिसरात हत्तींचा मुक्काम : धान पिकांची नासधूस सुरूच!


- आठ गावांतील शेतकरी धास्तावले; दिभना-अमिर्झा मार्गावर रात्रीच्या प्रवासालाही धोका, नुकसानभरपाईची प्रतीक्षा कायम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा चक परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने मागील आठवड्यापासून ठाण मांडले असून, या कळपाकडून परिसरातील धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात आहे. धान काढणीचा हंगाम सुरू असतानाच हत्तींचा कळप शेतांमध्ये शिरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चुरचुरा, महादवाडी, कुऱ्हाडी, नवरगाव, पिपरटोला, धुंडेशिवणी, कळमटोला आणि दिभना या आठ गावांतील शेतकऱ्यांमध्ये हत्तींच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधीच विविध नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता रानटी हत्तींचे नवे संकट उभे ठाकले आहे. वर्षभर मेहनत करून पिकविलेल्या धानाची काढणी करण्याच्या काळातच हत्तींचा कळप शेतांमध्ये शिरून पिकांची नासधूस करीत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हत्तींचा परिसरातील मुक्काम कायम असल्याने शेतीच्या कामासाठी शेतात जाणेही धोकादायक बनले आहे.

दिभना-अमिर्झा मार्गावर रात्रीच्या प्रवासाला धोका -
रानटी हत्तींच्या वावरामुळे शेतकऱ्यांसोबतच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास दिभना-कळमटोला-अमिर्झा मार्गालगत हत्तींचा कळप आढळून आला होता. शुक्रवारी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास चांभार्डा येथील प्रवाशांनाही असाच अनुभव आला.

हे प्रवासी परजिल्ह्यात देवदर्शनासाठी जाऊन परत येत असताना दिभना मार्गालगतच्या जंगलात त्यांना हत्तींचा कळप दिसून आला. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ट्रॅव्हल्स चालकाने वाहन पुढे नेण्याऐवजी माघारी वळविले. परिणामी, प्रवाशांना पुन्हा दिभना येथे परतावे लागले. या घटनेमुळे दिभना-अमिर्झा मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

महिनाभरापूर्वीच्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? -
दरम्यान, महिनाभरापूर्वी रानटी हत्तींच्या कळपाने पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस केली होती. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उशिराने पंचनामे केले. मात्र, नुकसान होऊन महिना उलटला तरी संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

एकीकडे मागील नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसताना दुसरीकडे हत्तींच्या कळपाकडून पुन्हा धान पिकांची नासधूस सुरू असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रलंबित भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.





  Print






Related Photos