भटके-विमुक्तांसाठी भंडारा जिल्ह्यात विशेष अभियान

- २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मंडळ व तालुकास्तरावर शिबिरे; प्रमाणपत्रांसह शासकीय योजनांचा लाभ देण्यावर भर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध शासकीय प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी भंडारा जिल्ह्यात २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमात पात्र नागरिकांनी सहभागी होऊन उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.
या अभियानासाठी महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत. मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मूलभूत कागदपत्रे थेट नागरिकांपर्यंत -
विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेता अनेकदा आवश्यक कागदपत्रे व शासकीय सेवांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी अथवा अधिवास दाखला, विवाह नोंदणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
विविध योजनांचा लाभ मिळवून देणार -
कागदपत्रे व प्रमाणपत्रांसोबतच पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यावरही अभियानात भर देण्यात येणार आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासह विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन व कार्यवाही करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी विशेष शिबिरांमध्ये उपस्थित राहणार असून, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरापूर्वीच लाभार्थ्यांची यादी -
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिबिरापूर्वी वस्तीस्तरावर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येईल. त्यामुळे शिबिराच्या ठिकाणी नागरिकांच्या अर्जांची व कागदपत्रांची कार्यवाही अधिक सुलभतेने पूर्ण करता येणार आहे. अभियानाच्या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
विविध विभागांचे अधिकारी शिबिरात उपस्थित -
विशेष शिबिरांमध्ये संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा आणि तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित सेवा, प्रमाणपत्रे आणि योजनांबाबत थेट मार्गदर्शन मिळणार आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
शिबिरांचे ठिकाण व वेळ लवकरच जाहीर -
२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांचे ठिकाण व वेळ याबाबतची माहिती संबंधित तालुका प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पात्र नागरिकांनी आपल्या संबंधित तालुका प्रशासनाकडून शिबिराची माहिती घेऊन त्यात सहभागी व्हावे. आवश्यक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी पात्र नागरिकांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.




Petrol Price




