ज्येष्ठ पत्रकार विजय मुडे यांना कर्मवीर पुरस्काराने गौरव : उत्कृष्ट वृत्तांकन स्पर्धेत साईनाथ सोनटक्के प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कर्मवीर पुरस्कार आणि उत्कृष्ट वृत्तांकन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान आणि उत्कृष्ट वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी संघाच्या सभागृहात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ब्रह्मपुरी येथील ज्येष्ठ पत्रकार विजय मुडे यांना पत्रकारितेतील दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘कर्मवीर’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट वृत्तांकन स्पर्धेत सकाळचे उपसंपादक साईनाथ सोनटक्के यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पुण्यनगरीचे उपसंपादक श्रीकांत पनकंटीवार यांनी द्वितीय, तर नवराष्ट्रचे उपसंपादक महेश भांडेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मंचावर संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर आणि सचिव प्रविण बतकी उपस्थित होते. यावेळी मनस्वी गिऱ्हे यांनी पत्रकारितेचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. पत्रकारांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पत्रकारांमधील एकोपा वाढविणे, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि गुणवत्तापूर्ण पत्रकारितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, ही संघाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ पत्रकार विजय मुडे यांच्या मानपत्राचे वाचन माजी अध्यक्ष मजहर अली यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पंकज मोहरीर यांनी केले, तर सचिव प्रविण बतकी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पत्रकार संघाचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र येऊन स्नेहसंवाद साधण्याची संधी मिळाली.




Petrol Price




