महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानाला गती : महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद


- स्मार्ट सौर योजनेतून मार्चपर्यंत ५ लाख घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट; पात्र ग्राहकांना हजारो रुपयांचे अनुदान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : महावितरणच्या सेवा संकल्प अभियानातून निर्माण झालेली गतिमानता आणि ग्राहकाभिमुख सेवेची संस्कृती केवळ अभियानापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने ती कायमस्वरूपी अंगीकारावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्षाच्या माध्यमातून विविध ग्राहकसेवा आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून, वीजग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त महावितरणच्या वतीने राज्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारून सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना विविध योजनांची माहिती, अर्ज सादर करण्याची सुविधा आणि संबंधित कामांसाठी आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सहा ठिकाणच्या विशेष सेवा कक्षांचा आढावा -
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी १६ ऑक्टोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कल्याण, चंद्रपूर, नाशिक, कोल्हापूर, भांडूप आणि पुणे येथील विशेष सेवा कक्षांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी चर्चा करून अभियानाच्या अंमलबजावणीबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

या अभियानाला वीजग्राहकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणारी गतिमान कार्यवाही कौतुकास्पद असल्याचे लोकेश चंद्र यांनी नमूद केले. ग्राहकांना सेवा देताना तत्परता, सुलभता आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ -
सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, नवीन वीजजोडणी आणि स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजना आदींच्या लाभासाठी विशेष सेवा कक्षांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या संवादादरम्यान सुशील जयप्रकाश पाटील (नवापूर, विरार), गजराबाई सुला वरडे (नाशिक शहर), आनंद सरदेशमुख (पुणे शहर), धीरज पत्रू नैताम (तळोदी, ता. चामोर्शी, जि. चंद्रपूर), गजानन घाग व बाळासाहेब नदाफ (कोल्हापूर शहर) आणि सुनील रामभाऊ बरड (सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड) या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. तसेच बँक प्रतिनिधींकडूनही योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली.

महावितरणच्या विशेष सेवा कक्षात अर्ज सादर केल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही झाली. त्याच ठिकाणी बँक प्रतिनिधी उपलब्ध असल्यामुळे कर्जासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करणे सोयीचे झाले आणि योजनांचा लाभ मिळविण्यास मदत झाली, असे लाभार्थ्यांनी सांगितले. या व्यवस्थेमुळे ग्राहकांचा वेळ वाचत असून, योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झाले.

मार्चपर्यंत ५ लाख घरांवर सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट -
स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट) योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाच लाख घरगुती वीजग्राहकांच्या छतांवर येत्या मार्चपर्यंत प्रत्येकी एक किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सौर ऊर्जेचा लाभ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या वीजखर्चात बचत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येत आहे.

योजनेतील अनुदानाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे - 
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक : केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये आणि राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपये अनुदान.

शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक : केंद्र सरकारकडून ३० हजार रुपये आणि राज्य सरकारकडून १० हजार रुपये अनुदान.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे पात्र ग्राहक : राज्य सरकारकडून १५ हजार रुपये अनुदानाची तरतूद.

उर्वरित रक्कम भरून पात्र ग्राहकांना या योजनेअंतर्गत सौर प्रकल्प उभारता येणार असून, त्यातून सुमारे २५ वर्षे मोफत विजेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले.

ग्राहकाभिमुख सेवा कायम ठेवण्यावर भर -
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि बँकांशी संबंधित मदत एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. या अभियानातून निर्माण झालेली कार्यतत्परता भविष्यातही कायम ठेवून वीजग्राहकांना जलद आणि सुलभ सेवा देण्यावर महावितरणने भर द्यावा, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

या संवाद कार्यक्रमाला महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर, ग्रामीण विद्युतीकरण कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सौम्या कांत, महावितरणचे कार्यकारी संचालक परेश भागवत आणि चंद्रमणी मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुख्य अभियंते पंकज तगलपल्लेवार (मुख्यालय), सुंदर लटपटे (नाशिक), हरिश गजबे (चंद्रपूर), संजय पाटील (भांडूप), स्वप्निल काटकर (कोल्हापूर), ज्ञानदेव पडळकर (प्रभारी, पुणे), रवींद्र आव्हाड (प्रभारी, कल्याण) यांच्यासह वरिष्ठ अभियंते, अधिकारी, बँक प्रतिनिधी, वीजग्राहक आणि विविध योजनांचे लाभार्थी सहभागी झाले होते.





  Print






Related Photos