

- लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधून १८ वर्षांची परंपरा कायम , अदाणी गो बॅक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधून पर्यावरण, वन आणि वन्यजीव संवर्धनाचा संकल्प करण्याचा ‘वृक्षरक्षाबंधन’ कार्यक्रम इको-प्रोच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. सलग १८ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला. २००८-०९ मध्ये लोहारा-मामला जंगलाच्या संरक्षणासाठी झालेल्या अदाणी गो बॅक जनआंदोलनाच्या स्मृतींना उजाळा देत या आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली. वन-वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी युवकांनी सदैव तत्पर राहावे, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमात जनता महाविद्यालय, एफईएस गर्ल्स महाविद्यालय, सुशीला मामीडवार महाविद्यालय, डॉ. खत्री महाविद्यालय तसेच समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी राजन तलमले, सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, योगेश दुधपचारे आणि इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत चंद्रपूरच्या नैसर्गिक संपत्तीच्या रक्षणासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. चंद्रपूर जिल्हा वनसंपदा, वन्यजीव आणि खनिज संपत्तीने समृद्ध आहे. मात्र, खनिज उत्खनन आणि विकासकामांमुळे वन्यजीवांचा अधिवास, भ्रमणमार्ग तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे विकास आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये समतोल राखणे ही नव्या पिढीसमोरील मोठी जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. किरणकुमार मनुरे, अशोक बनसोड, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रज्ञा जुनघरे डॉ. सचिन मिसार, डॉ. उमाकांत देशमुख, डॉ. कीर्ती श्रीवास्तव, प्रा. संतोष कावरे डॉ. रवी वाळके, सुरेश लोनबले यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इको-प्रोचे कुणाल देवगिरीकर, सचिन धोतरे, धर्मेंद्र लुणावत, राजू काहिलकर, आकाश घोडमारे, सनी दुर्गे, रुद्राक्ष धोतरे, विकिल शेंडे, भारती शिंदे, योजना धोतरे, शारदा काहिलकर, मनीषा जयस्वाल आदींनी सहकार्य केले.




Petrol Price




