महत्वाच्या बातम्या

 श्रावणातील घर तिथे सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या घर तिथे सामुदायिक प्रार्थना व भजन उपक्रमाला वसाहतीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील वर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या सभासदांच्या घरी हा उपक्रम राबविण्यात आला.

श्रावण महिन्यात दररोज सायंकाळी ७ वाजता सभासदांच्या घरी सामुदायिक प्रार्थना घेण्यात येत होती. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत होता. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यासोबतच सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वृद्धिंगत झाला.

ऊर्जानगर वसाहतीतील अशोक धमाणे, विनोद ऊईके, रामदास तुमसरे, शंकर दरेकर, देवराव कोंडेकर, बंडू कुळमेथे, विठ्ठल नन्नावरे, राजेंद्र पोईनकर, राजेश काळमेघ, बबनराव दडमल, मुरलीधर कौरासे, नानाजी बावणे, हरिश्चंद्र देवतळे, सुयोग वऱ्हाटे, भास्कर जोगी, अशोक खाडे, पुरुषोत्तम उगे, दिवाकर हेडाऊ, मनिषा बोथले, वैशाली दिलीप डुडुरे यांच्यासह अनेक सभासद परिवारांनी आपल्या घरी सामुदायिक प्रार्थना व भजनसेवा घेण्याची संधी मंडळाला दिली.

उपक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात सहभागी सर्व सभासद परिवारांचे आभार मानण्यात आले. सामुदायिक प्रार्थना उपक्रमाची सुरुवात आणि सांगता करण्याची सेवा दिल्याबद्दल धमाणे परिवार व डुडुरे परिवाराचा, तसेच संपूर्ण दिवस उपस्थित राहून सेवा देणारे भीमराव कुळमेथे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी दरवर्षी अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, पदाधिकारी, सेवक-सेविका तसेच ऊर्जानगर वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी महाप्रसादाचे आयोजन करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली.





  Print






Related Photos