देशात आठवडाभरात ३२ टक्क्यांनी कोरोना रुग्णसंख्येत वाढ


विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेले काही महिने देशात कोरोना रुग्णांचा आकडा कमी घटल्यानंतर आता पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. अलीकडील काही दिवसांत दक्षिण भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येने मागील दोन महिन्यांच्या तुलनेत उच्चांक गाठला आहे. चालू आठवड्यात देशभरात एकूण 2.9 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 32 टक्कांनी अधिक आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या तोंडावर देशाची चिंता वाढत आहे. असे असले तरी एकट्या केरळ राज्यात मागील आठवड्यात 1.9 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा देशात आढळलेल्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 65 टक्के एवढा आहे. मागील चोवीस तासांत देशात 42 हजार 909 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या पाच राज्यांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 29,836 रुग्ण एकट्या केरळमध्ये आढळले आहेत. यानंतर महाराष्ट्रात 4,666, आंध्र प्रदेशात 1,557, तामिळनाडूमध्ये 1,538 आणि कर्नाटकात कोरोनाचे 1,262 रुग्ण आढळली आहेत. देशात नव्याने आढळलेल्या जवळपास 43 हजार कोरोना रुग्णांपैकी 90.55 टक्के रुग्ण हे वरील पाच राज्यांतून समोर आली आहेत. ज्यामध्ये एकट्या केरळचा वाटा 69.53 टक्के इतका आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात 380 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 131 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर केरळात 75 जणांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या देशात कोरोना मुक्तीचा दर 97.51 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत देशातील एकूण 34,763 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत देशात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 19 लाख 23 हजार 405  वर पोहोचली आहे. यासोबतच भारतात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 324 एवढी आहे.
  Print


News - World | Posted : 2021-08-30


Related Photos