महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली गावपाटलाची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल रात्री नक्षल्यांनी गावपाटलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत तुमरकोठी येथे घडली. घिसू मट्टामी (५०) असे गावपाटलांचे नाव आहे. 

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घरी झोपेत असताना नक्षल्यांनी घिसू मट्टामी यास उठवून गावाच्या बाहेर घेऊन गेले. त्यानंतर त्याची दोन गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह रस्त्यावर ठेवला. सदर घटना आज सकाळी उघडकीस आली.

मृतदेहावर नक्षल्यांनी चिठ्ठी ठेवली होती. ठेवलेल्या चिठ्ठीत घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचे म्हटले आहे. मात्र, मृतक घिसू मट्टामी हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता. तर तो नक्षल्यांच्या ग्रामरक्षक दलाचा सदस्य असण्याची शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. त्यामुळे ही हत्या नक्षल्यांच्या अंतर्गत वादातून झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दीड महिन्यापूर्वी ८ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यातील झुरी गावचा रहिवासी दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी नामक आपल्या सहकाऱ्याची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्याचप्रकारे घिसू मट्टामी याचीही हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

Facebook    Twitter      
  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-12-30
Related Photos