महत्वाच्या बातम्या

 कार्यान्वयीन यंत्रणेवर होणार कारवाई


- वन स्टॉप सेंटर बाबत महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

- दरवर्षी नियमितपणे बैठकीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटर सद्यस्थितीत सरस्वती महिला शिक्षण मंडळ, चंद्रपूर या कार्यान्वयीन यंत्रणेद्वारे चालविण्यात येत आहे. सदर संस्थेने मानसिक छळ केला असून राजीनामा देण्यास भाग पाडले, अशी तक्रार पुनम बांबोळे यांनी केली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असून यात कार्यान्वयीन यंत्रणा दोषी आढळल्यास व्यवस्थापन समितीच्या निर्देशाने योग्य कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे महिला व बालविकास विभागांतर्गत वन स्टॉप सेंटर चे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा व मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्ती करण्याबाबत तरतूद आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या व्यवस्थापकीय समितीमार्फत सरस्वती महिला शिक्षण मंडळ, चंद्रपूर या संस्थेची ५ ऑक्टोबर २०२० रोजी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही यंत्रणेला एका वेळी तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्ती देण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार सदर यंत्रणेची मुदत ३० एप्रिल २०२३ रोजी संपुष्ठात येणार आहे.

वन स्टॉप सेंटर चे दैनंदिन कामकाज चालविण्याकरीता एकूण १४ पदे मंजूर असून सर्व पदे मानधन तत्वावर कार्यान्वयीन यंत्रणेमार्फत भरण्यात आली आहेत. तसेच सदर पदे अस्थायी स्वरुपाची आहेत. संस्थेचीच मुदत कमाल तीन वर्षाची असल्याने कोणताही कर्मचारी स्थायी होऊ शकत नाही. तसेच संस्थेत किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात येऊ नये, अशा शासनाच्या कोणत्याही मार्गदर्शक सुचना नाही.

तक्रारकर्त्या पुनम बांबोळे यांनी कार्यान्वयीन यंत्रणेने मानसिक छळ केला असून राजीनामा देण्यास भाग पाडले, अशी तक्रार केली आहे. या तक्रारीची महिला व बालविकास विभागाकडून चौकशी सुरू आहे. यात संबंधित यंत्रणा दोषी आढळून आल्यास व्यवस्थापन समितीच्या निर्देशाने योग्य कारवाई करण्यात येईल. तसेच वन स्टाप सेंटर बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समितीची बैठक दरवर्षी घेण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षात २० सप्टेंबर २०२२ रोजी बैठक घेण्यात आली होती. तर सन २०२३-२४ ची बैठक प्रस्तावित असून लवकरच घेण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos