तीन दिवसांत काॅपी कारवाईचे शतक : इंग्रजी, मराठी, हिंदीसह १७ भाषांत ११६ काॅपी प्रकरणे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : बारावी परीक्षेला बुधवारी २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या तीन दिवशी इंग्रजीसह १७ भाषा विषयांच्या परीक्षा पार पडल्या. केवळ भाषा विषयांच्या पेपरदरम्यान काॅपी केल्याप्रकरणी ११६ विद्यार्थ्यांवर कारवाई करीत राज्य मंडळाने कारवाईचे शतक पूर्ण केले आहे.
बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाला काॅपी केल्याप्रकरणी ५८ काॅपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली हाेती. सर्वाधिक २६ प्रकार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात, तर पुणे १५, लातूर १४, नाशिक २ आणि नागपूर १ प्रकार उघडकीस आले हाेते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी गुरुवारी २२ फेब्रुवारीला हिंदी पेपरला १४ प्रकरणांची नाेंद झाली. सर्वाधिक ७ प्रकार काेकण विभागीय मंडळ, तर लातूर ४, पुणे २ आणि छत्रपती संभाजीनगर १ प्रकार घडले, तसेच दुसऱ्या सत्रातील जर्मन, जापनीज, चायनीज आणि पार्शियन भाषांना एकही काॅपीचा प्रकार उघडकीस आला नाही.
शुक्रवारी २३ फेब्रुवारीला मराठीसह गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, पंजाबी आणि बंगाली, तर दुसऱ्या सत्रात उर्दू, पाली, फ्रेंच आणि स्पॅनिश या विषयांचे पेपर झाले. पहिल्या सत्रात काॅपी केल्याप्रकरणी ४२ आणि दुसऱ्या सत्रात नाशिक विभागीय मंडळात २ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये भाषा विषयाला काॅपी करण्याचे सर्वाधिक ३३ प्रकार छत्रपती संभाजीनगर येथे, तर नागपूर ४, अमरावती ३ आणि नाशिक विभागीय मंडळात २ असे प्रकारांची नाेंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर ६० जणांवर कारवाई -
पहिल्या तीन दिवसांत झालेल्या परीक्षेत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात तीन दिवसांत ६० काॅपी प्रकरणांची नाेंद झाली आहे. त्यानंतर, लातूर १८, पुणे १७, काेकण ७, नाशिक ४ या मंडळांचा क्रमांक लागताे.
News - Rajy