समाज कल्याण विभागाचे प्रयत्न ठरले यशस्वी
- नागपूर विभागातील ४६९ पैकी ३९१ वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : वंचित दुर्बल घटकांचा विकास करणे व त्यांना सामाजिक प्रवाहात आणणे हे ध्येय ठेवून सामाजिक न्याय विभाग सातत्याने कार्यरत आहे. जातीय सलोखा निर्माण करण्यात सामाजिक न्याय विभागाचे फार मोठे योगदान राहीले आहे. सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय शासनाने घेतला असून, महाराष्ट्रात राज्यातील वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करुन वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. या निर्णयाची समाज कल्याण विभागाने विविध यत्रणाशी समन्वय साधुन यशस्वी अमलबजावणी केली असल्याने नागपूर विभागातील सहा जिल्हातील ४६९ पैकी ३९१ वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार झाली आहेत. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच जातीवाचक नावे बदलण्यात आलेली आहेत हे समाज कल्याण विभागाचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.
राज्यात विविध शहरात व ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातीवाचक नावे दिल्याचे दिसून येते, उदा. महारवाडा, मांगवाडा, ब्राह्मणवाडा; अशी जातीवचक नावे महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत, ही बाब विचारात घेऊन राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे उदा. समता नगर, भीमनगर, ज्योतिनगर, क्रांतीनगर या प्रकारची नावे देण्याबाबतची कार्यवाही सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागात वस्त्यांची जातीवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना महापुरुष किंवा तत्सम नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
नागपूर विभागात शहर व ग्रामीण भागातील एकूण २३२ जातीवाचक वस्त्यांचे रस्त्यांची नावे बदलण्यात आली असून त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील ७३ नावे नगरपालिका क्षेत्रातील ४७ नावे व ग्रामीण भागातील ११२ नावे बदलण्यात आली आहेत. विशेष म्हणजे नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यातील २३२ पैकी २३२ नावे, वर्धा जिल्ह्यातील २१ पैकी २१ गडचिरोली जिल्हयातील ५ पैकी ५ तर गोंदिया ७२ पैकी ७२ जातीवाचक नावे बदलण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील ४९ पैकी ४६ जातीवाचक नावे बदलण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ९० पैकी केवळ १५ नावेच बदलण्यात आली आहेत. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ९ जातीवाचक नावे असून एकही नाव अद्यापही बदलण्यात आलेले नाही. चंद्रपूर नगरपालिका विभागात १६ पैकी १२ तर ग्रामविकास विभागमध्ये ६५ पैकी केवळ ३ जातीवाचक नावेच बदलण्यात आलेली आहे. यावरून असे दिसून येते की, चंद्रपूर जिल्हयात जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संथगतीने सुरु आहे यावरुन जातीवाचक नावे बदलण्यास चंद्रपूर जिल्ह्याची अनास्था असल्याचे दिसून येते.
समाज कल्याण विभागाच्या निर्देशानुसार सुमंत भांगे, सचिव सामाजिक न्याय व डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेल्या सुचनेनुसार श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी, विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील बैठकांमध्ये सातत्याने हा विषय प्राधान्याने घेण्यात येऊन याविषयी नागपूर विभागात कार्यवाही करण्यात आली आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाबरोबरच विविध यंत्रणांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे परंतु चंद्रपूर जिल्ह्यात अद्यापही याबाबतीत अनास्था असल्याचे दिसून येत आहे. डॉ.सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर.
News - Bhandara