जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आत्मा नियामक मंडळाचा आढावा
- कृषी विस्ताराला चालना, शेतकरी प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कृषी महोत्सवाबाबत चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आत्मा नियामक मंडळाची सभा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ब-हाटे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय बळकटे, रेशीम अधिकारी अजय वासनिक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुळकर, तसेच अशासकीय सदस्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, कृषी विभागाच्या विविध योजनेसंदर्भात ग्रामीण पातळीवर बैठका आयोजित कराव्यात. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी यांना सुचित करुन ग्रामपंचायत स्तरावर प्रगतशिल शेतकऱ्यांच्या बैठका घ्याव्यात. रब्बीचे पीक क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध पिकांचे क्षेत्र, उत्पादन व शेती शाळेची संख्या वाढवावी. यासाठी अतिरिक्त निधी लागल्यास उपलब्ध करून देता येईल.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा यांनी आत्मा अंतर्गत 2022 मध्ये राबविण्यात आलेले कृषी संलग्न उपक्रम, विविध कार्यक्रम, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी गट, कृषी प्रात्यक्षिके, नाविण्यपुर्ण बाबी अंतर्गत कार्यक्रम आदी बांबीचा आढावा घेतला.
कृषी विस्ताराला चालना देणे, कृषी विस्तारामध्ये सेवा पुरवठादारांचा समावेश करणे, शेती पद्धतीनुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन व उत्पन्न वाढविणे, शेतकरी समूहाची क्षमतावृद्धी करणे, शेतकऱ्यांच्या गरजा व मागणी विचारात घेऊन त्यानुसार शेतकरी समूह, शेतकरी गट तयार करणे, बाजाराभिमुख कृषी विस्तारावर भर देणे, कृषी संलग्न पशुसंवर्धन, मत्स्य, रेशीम, मधुमक्षिका, कुकुटपालन, कृषी प्रक्रिया विभागातील इतर कार्यक्रमासोबत सांगड घालणे हे आत्मा यंत्रणेचे उद्देश असल्याचे कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सागिंतले.
कृषि विस्तार कार्यात सुधारणा, स्मार्ट प्रकल्प, परंपरागत कृषि विकास योजना, 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणेची योजना, कृषि निविष्ठा धारकांसाठी पदविका कार्यक्रम, जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन आदी विषयांवार सादरीकरण करण्यात आले.
राज्यस्तरावरून आत्मा नियामक मंडळात अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. या प्रगतशील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला व शेतीसंबंधी व उत्पादनासंबंधी माहिती जाणून घेतली. तसेच शेतातील पिकांची लागवड, शेती करण्याची पद्धती आदी बाबींची विचारणा केली. यावेळी अशासकीय सदस्यांनी शेती संदर्भातील चांगले व वाईट अनुभवाचे कथन केले. तत्पूर्वी, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आत्मा नियामक मंडळातील अशासकीय सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
News - Chandrapur