कोसंबी खडसमारा येथे भीषण आग : सिलिंडर स्फोटाने तीन भावंडांचे घर जळून खाक


- लाखोंचे नुकसान; संसारोपयोगी साहित्य राख, निकुरे कुटुंब उघड्यावर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागून तीन भावंडांचे घर आणि संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घरात झालेल्या दोन गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे आगीने विक्राळ रूप धारण केले. सुदैवाने घटनेच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य शेतावर गेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अंदाजे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष यादव निकुरे, ऋषी यादव निकुरे आणि कार्तिक यादव निकुरे या तीन भावंडांच्या घरातून शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक धूर व आगीच्या ज्वाला उसळू लागल्या. परिसरात मानवी वस्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, घरातील दोन गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाल्याने आगीने आणखी रौद्र रूप धारण केले.
गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सतर्कतेमुळे आग इतर घरांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले आणि संपूर्ण गाव मोठ्या संकटातून बचावले.
या आगीत १०० सिमेंटच्या बॅगा, १५० किलो तूर व लाखोरी डाळ, ५० किलो गहू, एक क्विंटल तांदूळ, टीव्ही, कॉम्प्युटर, पंखे, विविध इलेक्ट्रिक साहित्य, ८० हजार रुपये रोख रक्कम, एक दुचाकी, सोने-चांदीचे दागिने तसेच दोन गॅस सिलिंडर पूर्णतः जळून खाक झाले.
विशेष म्हणजे, मागील वर्षी या तिन्ही भावंडांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. नवीन घरांचे बांधकाम सुरू असल्याने तिन्ही कुटुंबे तात्पुरत्या स्वरूपात एकाच घरात राहत होती. त्यामुळे या आगीत सर्व कुटुंबांचा संसार एकाच वेळी उद्ध्वस्त झाला.
घटनेची माहिती मिळताच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोडगे पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले तसेच स्वतः उपस्थित राहून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी त्यांनी बाधित निकुरे कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात तातडीची आर्थिक मदतही दिली.
घटनेनंतर प्रशासनाने पंचनामा प्रक्रिया सुरू केली असून बाधित कुटुंबाला मदत देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. घटनास्थळी गटविकास अधिकारी रवींद्र घुबडे, ग्राम महसूल अधिकारी भूपेन गौरे, ग्रामसेवक भूमिका आखाडे, प्रशासक संगीता जंगठे, पोलीस पाटील लोमेश गेडाम तसेच ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वस्व गमावलेल्या निकुरे कुटुंबाला शासकीय मदत कधी आणि कितपत मिळणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




