महत्वाच्या बातम्या

 पर्लकोटा पूल रस्ता वळविण्याच्या नव्या योजनेवर व्यापाऱ्यांचा विरोध : न्यायालयात धाव घेण्याचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : पर्लकोटा नदीवरील पूल बांधकामासंदर्भात भामरागड येथील व्यापाऱ्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मुख्य बाजारपेठेतील काही दुकाने नव्याने बाधित होऊ नयेत, यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत जोरदार इशारा दिला आणि आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा दिला.

भामरागड येथील पर्लकोटा पूलाचे बांधकाम गत पाच वर्षांपासून सुरु आहे. बांधकामापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या ३४ व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचे निश्चित झाले होते. या मोजणीनुसार प्रशासनाने वेळोवेळी नोटीस बजावून व्यापाऱ्यांना जागा रिकामी करण्याची सूचना दिली होती. अखेर, बाधित होणार्‍या व्यापाऱ्यांनी कोणताही आक्षेप न घेत आपली दुकाने रिकामी करून पर्यायी व्यवस्था स्वीकारली.

परंतु आता प्रशासनाने उजव्या बाजूच्या दुकाने बाधित करण्यासाठी नव्याने मोजणी करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की, पूर्वीची मोजणी कायम ठेवून काम करावे; नव्याने रस्ता वळविण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आवश्यक असल्यास न्यायालयात दाद मागू.

व्यापाऱ्यांच्या मते, पूल बांधकाम सुरू करण्यापूर्वी सर्व परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला होता. रस्त्याच्या वरच्या बाजूस हनुमान मंदिर आणि मशीद असल्याने खालच्या बाजूंच्या दुकानदारांचा विचार करूनच बांधकाम सुरू करण्यात आले. ५ वर्षांनंतर नव्याने मोजणी केल्यास मशीदला लागून असलेली मदरशाची इमारत आणि मशीद परिसरातील प्रवेशद्वार बाधित होण्याची भीती आहे.

व्यापाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, पूर्वी जी मोजणी झाली होती, त्यानुसार बांधकाम का केले जाऊ नये? वरच्या बाजूच्या दुकानदारांना आतापर्यंत कधीही नोटीस मिळाली नाही, तर आता नव्याने मोजणी करण्याची गरज काय?

पत्रकार परिषदेत आसिफ सुफी, मृत्यूंजय सरकार, सलीम शेख, तहिमदुल हसन, रवी कोंडापर्तीवार, दस्तगीर खां पठाण, रहेमान शेख, उत्पल हलदार, हमीद मोगल, सुलतान खां पठाण यांसह अनेक व्यापारी उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की पूल बांधकामासाठी विरोध नाही, परंतु पूर्वीची मोजणी कायम ठेवून काम करावे, अन्यथा न्यायालयात दावेखोरीस तयार राहतील.





  Print






News - Gadchiroli




Related Photos